Sunday, February 20, 2011

पुढे - मागे

पुढे जाणाऱ्यानी
विचार करु नये
मागे कोण आहे..

मागे राहण्यार्‍यानी
विचार करु नये
पुढे कोण आहे..

आपण एकटे की दुकटे
परके की जवळचे
याचाही विचार करु नये

याचा विचार करावा
की आपण कुठे उभे आहोत त्याचा..

Wednesday, February 16, 2011

शब्द..

शब्दांनाही पाहिलंय कधीतरी
हट्टी होताना,

खूप काही बोलायचे असून
अबोल अबोल राहताना,

शब्दांनीच शिकवलं
शुभेच्छा द्यायला

शब्दच जपून ठेवतात
त्या गोड आठवणींना

पप्पा हा शब्दच
मायेचा सागर

अधीर्‍या जीवनाचा
हा एक मुक्त सागर

Monday, February 7, 2011

इवलेसे मन

इवलेसे मन माझे
कुणाला सापडेल का?

नसे त्यास भान
जिकडे जाईल
तिकडचेच होईल.

म्हणे मजला
नाही मजला वेळ तुजसाठी,
जावुन येतो थोड्यासाठी.

मी जावू का मागे?
पण आता
काय उपयोग -

त्याने तर आता
सप्त समुद्र
ओलांडले असतील!!

Saturday, February 5, 2011

हारण्यासाठी जन्म.....

ना मोकळा श्वास,
ना मोकळे मरण
नसे स्वस्त हे जीवन की
पटकनी यावे मरण
माहित नसे त्यास किनारा
हारण्यासाठी जन्म आपुला

दुःखाशी सलगी करावी
तर सुख मध्ये येते
सुखाशी मैत्री करावी
तर दुःख आडवे येते
माहित नसे त्यास किनारा
हारण्यासाठी जन्म आपुला
हारण्यासाठी जन्म आपुला

Wednesday, January 12, 2011

पृथ्वीचे प्रेमगीतयुगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करु प्रीतीची याचना

नव्हाळीतले ना उमाळे उसासे
न ती आग अंगात आता उरे
विझोनी आता यौवनाच्या मशाली
ऊरी राहीले काजळी कोपरे

परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे
अविश्रांत राहील अन् जागती
न जाणे न येणे कुठे चालले मी
कळे तू पुढे आणि मी मागुती

दिमाखात तारे नटोनी थटोनी
शिरी टाकिती दिव्य उल्काफुले
परंतु तुझ्या मूर्तीवाचून देवा
मला वाटते विश्व अंधारले

तुवा सांडलेले कुठे अंतराळात
वेचूनिया दिव्य तेजःकण
मला मोहवाया बघे हा सुधांशू
तपाचार स्वीकारुनी दारुण

निराशेत सन्यस्थ होऊन बैसे
ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रृव
पिसाटापरी केस पिंजारुनी हा
करी धूमकेतू कधी आर्जव

पिसारा प्रभेचा उभारून दारी
पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ
करी प्रीतीची याचना लाजुनी
लाल होऊनिया लाजरा मंगळ

परी दिव्य ते तेज पाहून पूजून
घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षूद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझी दूरता त्याहुनी साहवे

तळी जागणारा निखारा उफाळून
येतो कधी आठवाने वर
शहारून येते कधी अंग तूझ्या
स्मृतीने उले अन् सले अंतर

गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे
मिळोनी गळा घालुनीया गळा
तुझ्या लाल ओठातली आग प्यावी
मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा

अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन्
मला ज्ञात मी एक धुलिःकण
अलंकारण्याला परी पाय तूझे
धुळीचेच आहे मला भूषण

कुसुमाग्रज

सवय


किती दाटीवाटीत राहतात
हि लोक
प्रश्न विचारे फ्लॅटवाले
एकमेकांना.

कसे इतके मोकळे
राहू शकतात
मनात असे प्रश्न
चाळवाल्यांच्या

सगळ्या वर एकच
उत्तर ज्याचा
त्याच्या सवयीचा
प्रश्न

Tuesday, January 11, 2011

हे दयाघना


दुःख तापाने व्यथित झालेल्या
माझ्या मनाचं तू सांत्वन करावं
अशी माझी अपेक्षा नाही,
दुःखावर जय मिळवता यावा
एवढीच माझी इच्छा.

सुखाच्या दिवसात नतमस्तक होऊन
मी तुझा चेहरा ओळखून काढीन.
दुःखाच्या रात्री सारं जग
जेव्हा माझी फसवणूक करील,
तेव्हा तुझ्याविषयी माझ्या
मनात शंका निर्माण होऊ नये
एवढीच माझी इच्छा.

रविंद्रनाथ टागोर

Sunday, January 9, 2011

इचलकरंजी - पुणे बस


जरा कवितांना बाजूला ठेवून थोडे भावाचे प्रवास
वर्णन..

बऱ्याच दिवसांनी बसने प्रवास करण्याचा प्रसंग आला. तसा आता पेट्रोलच्या किंमती व टोलच्या लुटीमुळे तसा कार प्रवास अशक्य झाले आहे. त्यातच वयामानाने ड्रायव्हिंग करायला कंटाळा येतो.
पण काही कारणासाठी मिनचेस जावे लागले. जाताना कोल्हापूर सूपर एक्सप्रेस पकडली. झोपण्यामुळे जातानाचा प्रवास जाणवला नाही.येताना मात्र वडगावच्या छोट्या बस स्थानाकामुळे बसची भीती वाटत होती.

इचलकरंजी-पुणे बस आली. बसची अवस्था बघितल्यावर प्रवास रखडत होणार याची खात्रीच पटली. बरोबर गावाकडील नातेवाईक असल्याने कराड पर्यंत तरी कंटाळा येणार नव्हता. कराडपर्यंत जुन्या गोष्टीना उजाळा देत प्रवास उत्तम झाला. कराड नंतर करायच काय हा मोठा प्रश्न होता. पण गाडीत एका नजर टाकली आणि लक्षात आले की प्रवासात खूप वेगवेगळ्या प्रकारचे लोक होते आणि प्रत्येक जण आपआपल्या विश्वात रममान होते. प्रवास थोडी फार पु. लं. च्या 'म्हैस' आणि 'बॉम्बे टू गोवा' ची आठवण होत होती.

माझ्या पलिकडील खुर्चीवर अगदी काल परवा लग्न झालेले एका जोडपे बसलेले होते. सतत एकमेकांच्या खोड्या काढ, मधेच कानात गुजगोष्टी कर.

त्यांच्या समोर तीन चार बाकडें सोडून तीन लहान मुले असलेले गरीब कुटुंब बसलेले होते. ते सतत कन्नड मिश्रीत मराठीत गोंधळ घालत होते. त्याच्या वागण्यात एक मोकळेपणा होता. साताऱ्यात बस थांबली तेव्हा सर्वांनी घरुन आणलेला डबा, विकत घेतलले वडापाव, भजी मिटक्या मारत संपवले. पुढे साताऱ्या बाहेरील टोल नाक्यावर स्ट्रॉबेरी घेवून ती ही संपविली!!

त्यांच्या या मुक्त वर्तनामुळे त्यांच्या पलीकडे बसलेल्या पांढरपेशातील पन्नाशीतल गृहस्थ वैतागुन चुळबूळत होता. बहुतेक त्याला त्यांचा गरीब असून सहजपणा पटत नव्हता. एक दोनदा त्याने त्यांना दरडावण्याचा प्रयत्न केला, पण त्या कुटुंबाने बसच्या आवाजात त्याच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले!

या सर्वांवर कहर म्हणजे दोन कॉलेज नुकतेच संपलेल्या मुली! माझ्या तीस पस्तीस वर्षाच्या लाल डबा प्रवासात एवढ्या फॅशनेबल (सूट होईल इतकच) मुली पाहिल्या नाही. एक सतत i-pod वर गाणे ऐकत होती तर दुसरी सतत मोबाइलवर गप्पा! त्यांच्या कला पाहून पुण्या पर्यंत नक्कीच बोअर होणार नाही याची खात्री पटली. पण त्यातील एक लवकरच उतरली.:(

साताऱ्यात रायगड जिल्ह्यातील काही शालेय मुलींचा गट चढला. बहुतेक कुठल्या तरी स्पर्धे साठी चालले असावे. त्यांचा चिवचिवाट, बोगदा आला की आरडाओरडात रुपांतरीत व्हायचा. सरांचा आवाज त्यांना थोड शांत करायचा. अर्थात सर, पुढें मॅडमशी शाळेतील राजकारण/समाज - गावकरी यावर गप्पा झोडत बसले होते.

एक मुस्लीम बाई मात्र या सर्वां पासुन अलिप्त होती. ती आणि तिची जागा .. कोणाला सहसा बसू दिले नाही.

बोचर्‍या थंडीत प्रथमच प्रवास संपू नये असे वाटत होते


copied from
http://prashantvpatil.blogspot.com/

Tuesday, January 4, 2011

आयुष्य एक कोडं


आयुष्य एक कोडं असतं

उलगडायला जावं तेवढ

जास्त गुंतत जात

उत्तरे मिळवण्यासाठी

प्रश्न शोधावी लागतात

कधी कधी

प्रश्न असतील तर

उत्तरच मिळत नाही

मिळालीच तर पुढचे

प्रश्न तयारच असतात

----डॉ. व्हि. एस. पाटील.

Monday, January 3, 2011

मैत्री - 2

कळी फुलल्यासारखी
मैत्री ही आपुली

क्षणाक्षणाला हुरहुरणारी
मैत्री ही आपुली

रुसव्या फुगव्यावर हसणारी
मैत्री ही आपुली

शिंपल्यातल्या मोत्यासारखी
मैत्री ही आपुली

चंद्राच्या शीतल छायेसारखी
मैत्री ही आपुली

आभाळालाहून विशाल
मैत्री ही आपुली

विश्वासाच्या सागरात डोलणारी
मैत्री ही आपुली

तरीही या मैत्रीला अविश्वासाचा किनारा .....

मैत्री

नद्यांच्या संगमासारखी होणारी
फुलपाखरांसारखी उडणारी
सुख दुःखाशी समरस होणारी
आनंदानं जगवणारी ....
विश्वासाला हळुवार जपणारी ....
चांदण्याच्या प्रकाशा प्रमाणे नितळ असणारी ....